थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढे नगरीत आपले स्वागत आहे.
   
 
संतांचा आदेश म्हणजे
केवळ मंदिरातील
आणि देवघरातील विचारांची पोथी
व व्यवस्थेची केरसूणी नव्हे, तर
तो एक जीवनाचा
पथदर्शक आहे.
जगाच्या संघर्षातून समाजास
शांतीकडे नेणारे ते एक पाथेय आहे.
समाजाची समृध्द अवस्था
निर्माण करणारी
व त्याच बरोबर समाजाला आदर्श
महान जीवनाचे दर्शन करवून देणारी
ती एक जीवनदर्शी निर्मळ
विचारप्रणाली आहे.
 
श्री बाबामहाराज आर्वीकर (माचणूर, मंगळवेढा)
(’दिव्यामृतधारा’ वरून)
 
 
 
 
   
  
                         मंगळवेढा हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका ठिकाण आहे. ही भूमी श्री संत दामाजी पंत, चोखामेळा, कान्होपात्रा या सारख्या संतांनी पावन झालेली आहे. सोलापूर पासून ५४ किलोमीटर तर दक्षिण काशी, पंढरपूर पासून केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूर अतांग पसरलेले काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिध्द आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मंगळवेढ्याची लोकसंख्या सुमारे २१६९४ एवढी आहे. त्यामध्ये ५२ टक्के पुरूष तर ४८ टक्के महिला आहेत. मंगळवेढ्याची साक्षरता दर ६८ टक्के एवढा आहे, आणि सुमारे १३ टक्के लोकसंख्या ही वय वर्षे ६ च्या आतील आहे. मंगळवेढ्याची प्रमुख भाषा मराठी असून तालुक्यातील दक्षिणेकडे कन्नड व मराठी या भाषा बोलल्या जातात. मंगळवेढ्याला सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी पिके घेतली जातात. त्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सुर्यफूल ही पिके घेतली जातात. मंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिंदु-मुस्लिम ऎक्याचे प्रतिक, गैबीपीरचा दर्ग्याला मुस्लिमा बरोबरच हिंदु भाविक ही जातात. तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव, मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळ जवळ २५ नवरात्र मंडळे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. मंगळवेढ्यात इंग्लिश स्कुल, दामाजी हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, ताराबाई गर्ल्स हायस्कूल, नुतन विद्यालय इ. प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, तर दामाजी महाविद्यालय, दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालये आहेत. अनेक गुणवंत विद्यार्थी या मंगळवेढे नगरीने दिले आहेत, त्यातील अनेक विद्यार्थी विदेशातसुध्दा वास्तव्य करीत आहेत. मंगळवेढा हे जरी निमशहर असले तरी फार पूर्वीपासूनच हे एक अतिशय महत्वाचे ठिकाण आहे, त्यामूळे मंगळवेढ्याला नगरपरिषद आहे. शहराप्रमाणेच या तालुक्यातील, माचणुर, हुलजंती या ठिकाणांना सुध्दा धार्मिक महत्त्व आहे.