इ.स. सन १००० ते १२०१


मंगळवेढे गावची ऎतिहासिक परंपरा अतिशय मोठी असून, अशी परंपरा लाभलेली गावे फारच कमी आहेत. मंगळवेढा हे गांव कधी काळी वसले याबद्दल निश्चित पुरावा नाही. परंतू फार प्राचीन काळी शालिवाहन शकाच्या सुरुवातीला मंगळवेढा हे शहर मंगल राजचे अधिपत्याखाली होते. या गावची बाजारपेठ त्यावेळी अतिशय भरभराटीत चालू होती. मंगल राजाच्या अगोदर हे गांव जीवनपूरी असे म्हणून प्रसिध्द होते. सध्याच्या मंगळवेढ्याच्या पश्चिम दिशेस जमिनीचे उत्खनन करताना सोन्या, चांदीचे दागिने, जून्या विठा, मातीची नक्षीदार सुंदर असलेली फुटलेले दगडी शिल्प अशा विविध वस्तू सापडत होत्या. परंतू कालांतराने जीवनपूरी या गावची वाताहत झाली. जीवनपूरीच्या पूर्वेस त्यावेळी निबीड असे अरण्य होते. त्यामुळे महाभयानक अशा अरण्यात मनुष्यवस्ती आजिबात नव्हती. जंगली हिंस्र स्वापदे व राक्षसांचे वास्तव्य त्या अरण्यात होते. व्दापारयुगात कौरव पांडवाच्या वेळी कौरवानी कपट दुताने खेळून पांडवाचे राज्य हिरावून त्यांना १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा दिली होती. तो वनवासाचा काळ भोगत असताना पाच पांडव धर्म, भिम, अर्जुन, नकुल व सहदेव फिरत फिरत त्या घनघोर अशा निबिड अरण्यात आले. महाभयानक हिंस्र पशुंच्या व क्रुर राक्षसांचे ते एक निवासस्थानच झाले होते. महाज्ञानी धर्म राजाने तेथील जमिनीची पाहणी केली. धर्म राजाने त्या जमिनीचा कस ओळखला. हे अरण्य नष्ट करून यातील जमीन सपाट केली तर निश्चितच येथे मनुष्यवस्ती होईल, लोक निर्भयपणे वावरतील, धर्मराजानी मनाचा ठाम निश्चय केला व अर्जुनास अनुज्ञा दिली. " अर्जुना, तुझ्या धनुर्विद्येच्या बळावर हे संपूर्ण घनघोर असे निबिड अरण्य जाळून टाक."  धर्म राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून अर्जुनाने धनुर्विद्येच्या जोरावर ते संपूर्ण अरण्य जाळून बेचिराख केले. परंतु तेथील जमीन उंच सखल भागात असल्यामुळे एक सपाट भाग जमीन दिसेना. ही जमीन  सपाट कशी करायची? हे जिकीरीचे कष्टाचे व ताकदीचे काम कोणी करायचे? "माझ्या भिमाशिवाय हे काम करण्याची ताकद कोणात नाही", हे धर्म राजाने जाणले व भिमास पाठीवर थाप मारून सांगितले, " भिमराया तुझ्या महाकाय गदेने ही जमीन सपाट कर." धर्मराजाची आज्ञा मिळताच भिमाने प्रचंड गदेच्या प्रहाराने भिमा नदीपासून पश्चिमेकडील संपूर्ण जमीन भूईसपाट करून टाकली. परंतू हे काम करताना ती प्रचंड महाकाय गदा झिजून गेली. त्यामुळे भिमाने ती गदा भिमानदी व माणनदीच्या संगमात टाकून दिली. (सद्या भिमा व माणनदी संगमावर सरकोली हे गांव वसलेले आहे). व्दापारयुग संपले. नंतर कालांतराने बरीच वर्षे लोटली. नदीच्या प्रवाहाच्या पाण्याने संगमातील वाळू कमी होऊन त्या प्रचंड महाकाय गदेचे झिजलेले लाकूड उघडॆ पडले. ही परिस्थिती जुन्या जाणकार लोकांनी पाहीलेली होती अशी एक लोक अख्यायिका आहे.

भिमा नदीच्या पूर्वेकडील जमीन सपाट करून पाच पांडव या प्रदेशातून वनवासाचा काळ व्यथित करत मजल दरमजल करत हस्तिनापूरात पोहोचले. पुढे कौरव पांडवाची घनघोर अशी लढाई होऊन त्या लढाईत कौरवांचा नाश झाला आणि धर्म राजा हस्तिनापूरचा राज्यकारभार पाहू लागले. धर्मराजाने न्यायनितीने राज्य करून सारी जनता सुखी केली. पुढे कालांतराने अर्जुनाचा नातू परिक्षीत राजाने पांडवानंतर हस्तिनापूरचे राज्य चांगल्या रितीने केले. परिक्षीत राजाचा मुलगा जनमेंजय हस्तिनापूरचा राजा झाला. जनमेंजयाने बरीच वर्षे राज्य करून भारत खंडातील जनता सुखी केली. जनमेंजयानंतर बराच कालखंड गेला. व्दापारयुगात यादवी माजून श्रीकृष्णाचा यदुवंश नष्ट झाला. सारी जनता हवालदिल झाली. श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपून कलीयुगास सुरुवात झाली. लोक दैनवान्या स्थितीत वाट दिसेल तिकडॆ मार्गस्थ होऊन चरितार्थात काफील्यानी राहू लागले. दक्षिणगंगा भीमा नदीच्या पश्चिमेकडील सपाट जमिन पाहून बरेच काफीले येथे येऊन राहू लागले. सपाट व सुपीक काळ्याभोर जमिनीत कष्ट करून भरपूर उत्पन्न निघू लागले. त्यामुळे हळूहळू याठिकाणची लोकवस्ती वाढू लागली. लोक या ठिकाणी घरे बांधून गुण्या गोविदांने जीवन कंठू लागले. मोठमोठे वाडे, सुंदर महाल व गावाकडेने मजबुत अशी तटबंदी बांधून परचक्र व चोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून तटबंदीच्या बाहेरील बाजूनी खोल असा खंदक खणून शत्रू सैन्यास सहजासहजी गांवात प्रवेश मिळू नये म्हणून संरक्षण केले. शत्रू टेहाळणीसाठी गावच्या चारी दिशेस उंच असे बुरुज बांधले गेले. जसजसा कालखंड जाईल तशी या गावची बाजारपेठ भरभराटीस येऊन व्यापार वाढून या गावची किर्ती दुरवर पसरली. लांबलांबचे व्यापारी या गावाशी संबंध जोडून मोठ मोठी सोन्या चांदीची दुकाने थाटून गावाच्या वैभवात आणखीन भर टाकली. दिवसेंदिवस या शहराचे वैभव वाढू लागले. त्यावेळचा नक्की कालखंड  कोणता होता याचा पुरावा लागत नाही. परंतु या शहराचे वैभव व भरभराटीचा काळ हा शालीवाहन शकाचे अगोदरचा असावा. एवढे वैभवशाली सुंदर व भरभराटीचे आलेले सुखी, संपन्न शहर आपले आधिपत्याखाली असावे, या शहराचा सम्राट आपण व्हावे, यावर आपली सत्ता असावी म्हणून मंगल नावाच्या राजाने या शहरास आपल्या सैन्यानीशी चोहोबाजूनी वेढा दिला. परंतू मजबूत तटबंदी असल्यामुळे मंगलराजाचा काही इलाज चालेना, तरीपण मंगल राजाने आपल्या सैन्याचा वेढा बराच काळ उटविला नाही. सरते शॆवटी गावाची रशिद बंद पडली. तेथील अंमलदार अखेर राजास शरण येऊन ते शहर मंगल राजाचे अदिपत्याखाली आले. मंगल राजाने सैन्यानीशी वेढा देऊन हे शहर जिंकून घेतले. तेंव्हापासून या शहराचे नाव मंगळवेढा असे पडले, अशी लोक अख्यायिका आहे.

मंगळवेढे शहरातील सर्वात जूनी प्राचीन सुंदर वास्तू म्हणून किल्ल्यामागील काशीविश्वेश्वराचे मंदीर असा उल्लेख करता येईल. तेथील मुळचे देऊळ इ.सन. १० व्या व ११ व्या शतकात म्हणजे चालुकय कलचुरीचे उत्तर काळात अथवा यादवांचे अधिपत्याखाली बांधले गेले असावे, कारण देवळाचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीप्रमाणे आहे. यादवोत्तर काळात हे मंदीर मोडकळीस आले होते. पुढे मुसलमानी राजवटीत विजापूरच्या गादीवर आल्ली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी शके १४९४, इ.स. १५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा असून जसाचा तशा न देता सलग देत आहोत.


 

शिलालेख 

श्री. गणेशायनम: आदौ कर्ता। तर्तो सौंहर्ता तदनंतर जीवाना जठर भर्ची गौरी। भर्ता पुनान तुमाम॥--॥ स्वस्ती श्री जय अभ्युदय शालिवाहन शके १४९४ प्रवर्तनामे ॥ -- ॥ अंगीरस नाम ॥ संवस्तरे दक्षिणायने १) वर्षा ॠतो भाद्रपद मासी शुक्ल पक्ष । तृतिया स्थिरचंद्र वासरे तत्काळे हस्त नक्षत्रे साध्य नाम योगे, तैतिला करणे । धनुलग्ने, अस्मीन पुण्य दिवसी । श्री निजभक्त श्रीमंत भारद्वाज गोत्र, कात्ययन सुत्र, शुक्ल युजू २) शाखा ध्यायचे, लाहयानी धनाजी हिप्परगे कळे येथील कुलकर्णी ॥ विजापूर देशाचे परगणे ॥ मंगळवेढे ॥ यांचे स्थळी. मुन्मू । करिता वेळे कसबे मध्ये । जोगी बावी सान्निधाने जुने देऊळ पडले, ते जिर्णोध्दार करुन, श्री काशीविश्वनाथ लिंग प्रतिष्ठापना करून ३) तिरणभट उपाध्येशी अनगर कराशी देवाची पुजा व अध्यायन सांगावया करणे ठेवले. त्यासी स्वस्ती देसाई हिरॊजी व कसगावडा वा मळशेट्टी होनरावू वा मळकोजी वा आनंद पटेलासी सांगितले. । त्यांने यासो मुठी केला. । प्रजाभागामध्ये चालवू. म्हणून वाक सुकृत दिधले असे. ४) पुढे यासी साक्षी बोयाजी भगरावा तिमाजी सौकळ कुलकर्णी. कसबेचा पुजा. गुरोजी संबंध नाही. त्याने धुपारतीने वेळे मांधळ वाजवून नेवैद्य द्यावा. विडा दक्षिणेसी सबंध नाही. हे वोळासी विळ होवून चौधीरचा नरसो पटेल. अंगीकार असे यासी जो दुसरे कोणी येईल त्याचे वंशवरी गाढव असे.                                                                                                            ॥ मुल्ला याकूब काढले असे. तुका कुलकर्णी.

                                                                                                                    शिलालेख - संकलन

                                                                                                                      श्री गोविंद रघुनाथ सबनिस.

 

शालीवाहन १० वे शतकात या मंदीराचे जिर्णोध्दार, भारद्वास गोत्रातील धनाची हिप्परगी यांनी केला. असा शिलालेखाचा उल्लेख आहे. श्री काशिविश्वेश्वर मंदीराचे बांधकाम शालिवाहन ७ व्या शतकात झाले असावे. मंदीरावरील दगडी देव देवतांचे शिल्प फारचे पुरातन काळातील आहेत.


मंदीराजवळील विहीर त्याच वेळी बांधली असावी. कारण शिलालेखात मंगळवेढे यांच्या स्थळी- मुन्मु करता वेळे कसबेच्या जोगी बावी सान्निध्याने जुने देऊळ पडले असा उल्लेख आहे. विहिरीचे बांधकाम सुध्दा अतिशय पुरातन काळातील आहे. विहीरीतीळ देव देवतांच्या मुर्ती जीर्ण झालेल्या आहेत. ( जगातील बह्मदेवाच्या तीन मुर्तीपैकी एक ब्रह्मदेवाची मुर्ती विहीरीतील कमानीत पूर्वाभिमुख बसविली आहे) यावरून मंगळवेढ्याची एतिहासिक परंपरा फार प्राचीन काळातील असावी.  ब्रह्मदेवाच्या मुर्तीशेजारी एक भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग मंगळवेढ्याच्या पश्चिमेस कृष्ण तलाव नावाचा एक तलाव आहे. हा तलाव कोणी खोदला याचा पुरावा सापडत नाही. परंतू तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाचे पुरातन असे सुंदर मंदीर बांधले होते. विहीरीतील भुयारी मार्ग या गोपाळ कृष्णाच्या मंदीरापर्यंत आहे. अशी लोक अख्यायिका आहे. ही अख्यायिका सत्य असावी. कारण महाराष्ट्र शासनाने १९७२ साली जो दुष्काळ पडला त्यावेळी कृष्ण तलावाचे उत्खनन केले. त्यावेळी तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाच्या मंदीराचे जुने अवशॆष मोठमोठ्या शिळा भंगलेले दगडी शिल्प, मंदीराचा चबुतरा पडीक अवस्थेत आहे. अजून त्या ठिकाणी मंदीराचे जुने पडीक बांधकाम पाहवयास मिळते. मंगळवेढ्याच्या ऎतिहासिक परंपरेचा अतिशय जुना इतिहास म्हणजे दक्षिणेस १ कि.मी. अंतरावर माळावर एकविरा देवीची फार प्राचिन काळी बांधलेले जुने मंदीर आहे. मंदीरासमोर उंच दिपमाळ बांधलेली असून भग्न अवस्थेतील दगडी हत्ती व दैत्याची मूर्ती आहे. हे मंदीर कोणी बांधले व केंव्हा बांधले याचा नक्की पुरावा सापडत नाही. देवीची मुर्ती (मुकवटा) भव्य असून रागीट भाव चेह-यावर आहेत. देवी अत्यंत जागृत असून मुर्तीसमोर शकून पाहण्याचे दोन गोल असे दगड आहेत. मंदीराच्या बांधकामाचे बाहेरील बाजूच्या दगडावर पुसट असा शालीवाहन सात असा मजकूर होता. परंतु तो दगडही ऊन, पावसाळ्यामुळे खराब होऊन जीर्ण झाला आहे. यावरून हे मंदीर १५०० वर्षापूर्वी बांधलेले असावे. महाराष्ट्रात एकविरा देवीची मंदीरे फार थोडी आहेत. या मंदीराचे बांधकाम मोठ मोठ्या शिळाचे, दगडाने बारीक घडई करुन मजबूत बांधले आहे. मंदीरावर घुमटया आकाराचे शिखर आहे. एकविरा मंदीराच्या आसपास आता देव देवतांची बरीच मंदीरे बांधली आहेत. देवीच्या मंदीराच्या दक्षिणेला द-याबाचे मंदीर आहे. उत्तरेकडील बाजूस यल्लमा देवीची नवीन तीन मंदीरे बांधली आहेत. दक्षिणकेदार जोतिर्लिंगाचे सुशोभित भव्य असे मंदीर असून समोर उंच अशी दिपमाळ दिमाखात उभी आहे. जोतिबाच्या मंदिराचे उत्तर दिशेस काळभैरवनाथाचे मंदीर आहे. दरवर्षी या देव देवतांचे भव्य  अशा मंदीर परीसरासमोर चैत्र महिन्यापासून नवरात्र महोत्सवापर्यंत भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रात नऊ दिवस याठिकाणी भाविक येतात.     दस-यादिवशी शिमोलंगनासाठी भाविक भक्तांची अलोट अशी गर्दी असते. त्यादिवशी एकविरादेवीचा माळ भाविक भक्तांचे जयघोषाने दुमदुमुन गेलेला असतो. संताच्या पदस्पर्शाने व देवदेवतांचे वास्तव्याने पुनित झालेल्या मंगळवेढे नगरीचा एतिहासिक परंपरेचा ठेवा अगदी थोडक्यात काही लोक अख्यायिकाच्या आधारे व पौराणिक माहीतीच्या आधारे दिला आहे. मंगळवेढा गावाची एतिहासिक परंपरा फार मोठी आहे. अशी परंपरा असलेली गावे फारच क्वचित आढळतात. हे गाव कधी वसले याबद्द्ल निश्चित माहीती मिळत नाही. पूर्वीच्या शिलालेखावरून एक हजार वर्षांपूर्वी हे गांव राजधानी असून त्यावर कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटांचा अंमल होता.  इ.स. १०६० ते ११२१ पर्यंत या गांवी कलचुरी घराण्याचे राज्य होते व मंगळवेढा राजधानी होती. श्री बसवेश्वर (लिंगायत धर्माचे मूळ संस्थापक) हे त्या विज्जल राजाचे प्रधान होते. त्या बिज्जलचा आजोबा कलचूर्य घराण्यांतील जगत व पेरमाडी यांनी या ठिकाणी महामंडलेश्वर म्हणून राज्य केले आहे. तेंव्हा या शहराचे वैभव फार मोठे होते. वैदिक, जैन, शैव, वैष्णव वगैरे अनेक पंथांचे व संस्कृतीचे हे संगमस्थान होते. त्यावेळी येथे व्यापारी पेठ होती. त्या वेळची येथील लोकसंख्या हजारापेक्षा जास्त होती. गावात सुंदर देवळे होती. देवगिरीचे यादव पन्नास वंशातील राजा भिल्लम याने मंगळवेढे येथील कलचुरी घराण्याच शेवटचा राजा बिल्हण याचा इ. सन ११९१ मध्ये नाश केला.