इ.सन १४०० ते १५००

                         देवगीरीचे यादव घराण्याचे बहामनी राजाने पराभव केल्यानंतर मंगळवेढे बहामनी राज्यात सामील झाले. बहामनी राज्याचे वेळीच इ.स. १४५८ ते १४६० या साली श्री. दामाजी पंतांचा प्रसिध्द दुष्काळ पडला व श्री. दामाजीपंत त्यावेळी तेथील तहसिलदार असल्यामुळे भुकेने व दुष्काळाने पीडीत झालेल्या लोकांकरीता त्यांनी पेवे लुटविली. त्याकरीता बादशहाने त्यांना कैद केले असता पंढरीच्या पांडुरंगाने विठु महाराचे रुप घेऊन दरबारात पैसा भरला व श्री. दामाजीपंतांची सुटका केली. नंतर मोगल सरदार बहादूर जिलाणी याने मंगळवेढे आसपासचा मुलूख जिंकला व मंगळवेढे दिल्लीचे मोगल अंमलाखाली इ.सन. १४६५ ते १४७५ पर्यंत होते. इ.सन १४९३ मध्ये मंगळवेढे येथे भुईकोट किल्ला बांधला गेला व हे एक प्रमुख व मजबूत लष्करी ठाणे म्हणून प्रसिध्द झाले. ता. ५/११/१४९४ रोजी बिदर बादशहा महबूबशा यांने स्वारी करून बहादूर जिलाणीचा पराभव करून व त्यास ठार मारून मंगळवेढे पुन्हा जिंकून आपल्या ताब्यात घेतले. इ.स. १३९६ ते १४०८ अशी बारा वर्षे दुर्गा देवीचा दुष्काळ या भागात पडला, त्यात मंगळवेढे ही सापडले. नंतर इ.स. १४२२ व १४२३ आणि इ.स. १४६७ ते १४७४ यासाली दोन मॊठे दुष्काळ पडून मंगळवेढे गावाची वाताहत झाली. दुष्काळामध्ये लोक गाव सोडून गेले, देश हैराण झाला. २० वर्षे मंगळवेढे गांव पडीक राहीला. गावात थोडीच घराणी राहीली म्हणून परगावातून व लांबून मॊठी घराणी येथे आणुन त्यांना जमिनी देऊन पुन्हा वसाहत करावी लागली. नागांवचे प्रतापरुद्र इंगळे यांना आणुन देशमुखी करून दिली. 

        आलूर अचालेरे येथून भानशेट होनराव यांस आणून देशमुखीच्या तीन तक्षिमा करुन दिल्या. अनग-यातून कोयाजी बीन नागदेव यांस आणुन देशमुखीच्या चार तक्षिमा केल्या. विठठल कसगावडा, चंडरस कुलकर्णी ही घराणी गावांतच होती. त्यांना पाटील कुलकर्णी वतने दिली. परगावाहून खालील......

फुगारे, भगरे, हजारे, जठार, उन्हाळॆ, कौंडुभैरी, धावलिंग, मुरडे, ताड, टकले, आयवड, शहाजादे, कानुइंगळे, तानगावडे, तीपनाईक, कसगावडे, गवळी, चौगुले, नाडगौडा, बोधले, जोगण, जावळे, बहीरजी, ढवण, जोशी, काटकर, घाटूळ, घुले, चौधरी, महाजन, खराडे, वाकडे, भांगे, आवताडे, उमाटे, गुंगे, मुदगुल, बोमण्णा, वठारे, यादवाडचे होनमाने इत्यादी घराणी मंगळवेढ्याला आली.

या लोकांनां ज्या ज्या भागात जमिनी दिल्या तेथील झाडी तोडून जंगल साफ करून त्यांनी शेती केली. त्या त्या स्थळाला त्यांची नावे दिली असून आजही मंगळवेढे शिवारातील जमिन अमक्या स्थळात आहे अशी ओळखली जाते. सर्व स्थळे मिळून ७२ भागात मंगळवेढेची जमीन वाटली गेली आहे. इ.सन. १४८९ मध्ये मंगळवेढे गांव जिंकून विजापूरच्या अदिलशाहीने आपल्या राज्यात सामिल केला.