इ. सन. १६०० ते १७००

    इ.सन. १६०० ते १७०० या शंभर वर्षात मंगळवेढे पुन्हा भरभराटीस आले. प्रमुख लष्करी ठाणे म्हणून ओळखले जाऊ लागले. अकबराचा सरदार मीर जयाउद्दीन मुस्ताफाखान मंगळवेढ्यास इ.सन. १६०३ मध्ये रहात होता. त्याचा अंमल आजू बाजूचे पन्नास कोसावर चालत असे. म्हणून हा किल्ला हस्तगत करण्याकरिता वारंवार लढाया होत असत. विजापूरचा सरदार सर्जाखान व मोगल सरदार जयसिंगराजे यांची या किल्ल्याकरिता लढाई झाली. त्यावेळी श्री छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरचे विरुध्द मोगल सरदारास मदत केली होती. ता. १८/१२/१६६५ रोजी मंगळवेढे किल्ल्यात श्री छ्त्रपती शिवाजी महाराज व राजे जयसिंग यांची भेट झाली होती. नेताजी पालकर यांनी विजापूर दरबाराविरुध्द मोठी लढाई करून विजापूर दरबारचा पराभव केला. पण पुन्हा ता: ३१/०५/१६६६ साली हा किल्ला विजापूर दरबाराकडे गेला. श्री छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा तो जिंकून घेतला. इ.सन. १६९५ ते १७०२ औरंगजेबचा मुक्काम मंगळवेढ्यापासून नऊ मैलावर बेगमपूर येथे होता. बॉम्बे गॅझेटीअरवरून असे दिसते की, मंगळवेढे गाव पुर्वी तीन भागात विभागले होते. १) किल्ला  २) कसबे ३) शनिवार पेठ.   पेठ केंव्हा वसली याची निश्चित माहीती नाही. सध्याचे वार्ड क्रं. १ व वार्ड क्रं २ यास कसबे म्हणत होते. त्या कसब्याभोवती इ.स. १६९४ साली गावकूस बांधले. त्याची एकंदर लांबी ६९३६ फूट व रूंदी ८ फूट होती. त्याच्या पुर्वेस बोराळे नाका, नेऋत्येस सांगोला नाका व उत्तरेस बुरुज १२० फूट उंच व १४ फूट व्यासाचा होता, असे चौरंग बुरुज होते. भुईकोट किल्ल इ.स. १४९३ साली बांधला त्याची लांबी उत्तर दक्षिण अंगास १२४५ फूट, पूर्व अंगास १२०० फूट व पश्चिम अंगास ९२० फूट आहे. तट १३ फूट रुंदीचा व ३५ फूट उंचीचा होता. त्यास सात बुरुज होते त्यांची नावे--- मर्दान, करड, चौफाळा, जगभावी, गच्ची,कैकाड आणि बोराळ. सर्वात मोठा बुरुज मर्दान नावाचा असून त्याची उंची ५७ फूट व व्यास ५० फूट आहे. तो सध्याचे लक्ष्मीनारायण देवळासमोर होता. किल्ल्याभॊवती खंदक ८२ फूट रुंद होता. पुर्वेस मुख्य वेस असून ती १४ फूट उंच व १२ फूट रूंद होती.