इ. सन १७०० ते १८००

    इ. सन १७०० नंतर मोगल अंमल संपून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. श्री छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना प्रमूख नेमले. इ.सन. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल होता. त्यानी सध्या उभी असलेली चौबुर्जी इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. ही चौभुर्जी मुख्य किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी २३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू लागले. सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय. इ. सन. १७४२ ते १७५० पर्यंत पंतप्रतिनिधीचा अंमल असून यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते. इ.सन. १७५० पासून  प्रथक कमाविसदार म्हणून मंगळवेढ्यास आले. नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या सरंजामांत हा किल्ला इ.सन १७५१ साली दिला गेला. पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. गोविंद हरी पटवर्धन यांच्यावर पेशवे दरबारची इतराजी झाली. त्यावेळी ते मंगळवेढे येथे किल्ल्यात येऊन राहीले होते. त्यावेळी त्यांनी श्री संत दामाजी महाराज यांची सेवा केली म्हणून त्यांना त्यांच्या कृपा प्रसादांमुळे जहागिर परत मिळाली अशी त्यांची श्रध्दा होती. पुरुषोत्तम दाजी पटवर्धन हे मघ:श्याम याचे नातू होते. ते मंगळवेढे येथे राहत असत. इ. सन १७५५ साली श्रीमंत नानासाहेब पेशवे, श्रीमंत भाऊसाहेब पेशवे व श्रीमंत दादासाहेब पेशवे हे मंगळवेढे येथे येऊन काही दिवस राहीले होते. त्यावेळी मंगळवेढे परगणा होता व आंबेगाव (सध्या आंबे-चळे म्हणुन असलेला गाव) मंगळवेढे परगण्याखाली होता. तो गांव त्यावेळी श्रीमंत पेशव्यांनी नारायण कृष्ण व पुरुषोत्तम कृष्ण यांना इनाम करुन दिला. श्री. पुरुषोत्तम दाजी हे श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा खून झाला त्यावेळी मंगळवेढ्यास राहात होते. दाजी मोठे शुर असून त्याचे वक्तृत्व चांगले होते. ते धाडसी असून पराक्रमी होते. म्हणून श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या वधानंतर त्यांच्या पत्नी गंगांबाईसाहेब या गरोदर असताना त्यांना संभाळण्याकरीता मुद्दाम श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांना नाना फडणिसांनी पुण्यास बोलावून नेले होते. दाजी मरण पावल्यानंतर त्यांच्या पत्नी आंब्यास राहावयास गेल्या. इ.सन. १७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास आला होता. पण मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले. पहिली सरदारकी मिळाली. इ.सन. १८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धण घराण्याकडे होते.