इ. सन १८०० ते १९००

    इ. सन १८०८ ते १९०० मध्ये पटवर्धन घराण्याच्या वाटण्या होऊन मंगळवेढे तालूका श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर पटवर्धन यांचे वाटणीस गेला. इ.सन. १८१८ मध्ये मंगळवेढयाहून तीस मैलावर असलेल्या अष्टी गावी शेवटची मराठा व इंग्रज यांची लढाई होऊन मराठा साम्राज्य लयास गेले व पेशवे यांचे सेनापती बापू गोखले हे धारातिर्थी पडले.

    आजही मंगळवेढे गावात सेनापती बापू गोखले यांचा वाडा पडक्या स्थितीत आहे. श्री संत चोखामेळा चौकातुन पुर्वेस मारवाडी गल्लीतून थोडे पुढे गेलो की आपणास उजव्या हातास तो वाडा आहे. आपल्या तलवारीचे तिखट पाणी इंग्रजास पाजून मराठी साम्राज्य टिकविण्याची खटपट करणारा हा शुर योध्दा मंगळवेढे येथे राहत होता. याचा अभिमान मंगळवेढे जनतेस आज पाहीजे. पण मंगळवेढ्याची जनता बापू गोखले यांना आज विसरली आहे व त्यांचे गावात कोठेही स्मारक नाही. मराठी राज्य गेले पण महाराष्ट्राचे मन इंग्रजानी संपूर्ण मारलेले नव्हते. इ. सन. १८५७ साली उत्तर भारतात स्वातंत्र्याचा प्रयत्न होताच त्याचे पडसाद ही मंगळवेढे गावात उठले. काही प्रत्यक्ष कृती करीत होते. इंग्रजी सरकार संशयावरुनही पकडून लोकांना त्रास देत होते. स्वातंत्र्य युध्दात भाग घेतला म्हणून मंगळवेढ्याहून श्री. नारायणराव नाना पटवर्धन, भास्करराव जंमखंडीकर, आलमसाहेब काझी व एक मराठी ग्रहस्थ यांना ता. १/१२/१८५७ रोजी पकडून सातारा येथे चौकशीकरीता नेले. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले. पहिले श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब नंतर श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब हे सांगली संस्थानाचे अधिपती झाले. त्यांना १८५९ साली मुखत्यारी आली. त्यांचे कारकार्दीत सांगली संस्थानाचा कारभार काही वर्षे ब्रिटीश सरकारखाली होता. इ. सन १८७६ पर्यंत हा किल्ला मजबूत व शाबूत होता. सांगली संस्थानात ब्रिटीश ऍडमिनिस्ट्रेशन आल्यामुळे जॉईंट ऍडमिनिस्ट्रेशन कॅप्टन वेस्ट यांनी किल्ल्याचे दरवाजे कायमचे पाडले व मेजर वॉलरने तट पाडला. तटाची माती व दगड लोकांनी नेली व खंदक ही बुजवला गेला. काही बुरुज पडले काही बुरुज मुद्दाम पाडले गेले.

    १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाले आणि १९/०२/१९४८ रोजी ज्यावेळेस सांगली संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाल्यानंतर मंगळवेढे हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालूका झाला.
 
 
पुढे वाचा मंगळवेढा लयास जाणारे वैभव