श्री टिकाचार्य


        धोंडूराम रघुनाथ देशपांडे हे विजयनगरचे राजे रामदेवराय यांचे दरबारी कामास होते. ते अतिशय हुशार, धाडसी वृत्तीचे, कर्तबगार असे विश्वासू नोकर होते. ते विलक्षण धाडसी होते. भरघाव वेगाने, सुसाट पळणा-या घोड्याच्या पाठीवर सहज उभे राहून बेफान घोडा पळवत असत. त्यांच्या या विलक्षण धाडसी वृत्तीचे कौतुक करुन रामदेवरायांनी त्यांचा मोठा सत्कार केला होता. विजयनगरला असताना धोंडूराय एक दिवस सकाळच्या वेळी जंगलात फिरावयास गेले. सकाळच्या उन्हात एका झाडाखाली ते निवांत झोपले असता अचानक शेजारील वारुळातून एक भला मोठा भुजंग येऊन त्याने धोंडूरायांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपली फणा काढून धोंडूरायाच्या मस्तकावर धरली. केवढा हा अजब साक्षात्कार आणि त्याच वेळी रामदेवराय व त्यांचे दरबारातील साथीदार घोड्यावर बसून फिरत फिरत त्या ठिकाणी आले. त्याने ते अजब दृश्य पाहून त्यांचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसेना. स्वत: रामदेवरायांनी धोंडुरायांना नमस्कार केला. हा कोणी सामान्य पुरुष नसून साक्षात्कारी अवतारी पुरुष आहेत, असे त्यांनी गौरवोदगार काढले. धन्य धन्य ते धोंडूराया रघुनाथ देशपांडे व त्यांचे वशंज, अशा संत सज्जनांचे पद्स्पर्शाने पावन झालेली धन्य ती मंगळवेढे नगरी, यांची हकीकत विलक्षण आहे. धोंडूराया रघुनाथ देशपांडे हे महापराक्रमी व घोड्यावर बसण्यात पटाईत होते. ते घोड्यावर बसूनच भिमा नदीच्या महापूरातून पलीकडे जात असत व मध्यपूरात घोड्यावर बसूनच तोंडाने पाणी पीत असत. चंद्र्भागेच्या पैलतीरावरील श्रीमध्वाचार्याचे गादीवरील श्री अक्षोभ्यतीर्थ यांना साक्षात्कार होऊन त्यांनी धोंडूरायाला सन्यास दिक्षा देऊन त्यांचे नाव जयतीर्थ ठेवले. पण धोंडूरायाच्या आई वडिलांनी त्यास पुन्हा मंगळवॆढ्यास आणले व संसारात रमविण्याचा प्रयत्न केला. व त्यांची बायको गर्भादानाच्या दिवशी रात्री खोलीत गेली तेंव्हा गादीवर महाभुजंग दिसावयास लागला तेंव्हा ती घाबरून बाहेर आली. नंतर टिकाचार्य हे विजयनगरच्या साम्राज्याकडे तपश्चर्येस निघून गेले. हा भुजंग त्या खॊलीत पुष्कळ दिवस दिसत होता. जयतिर्थांनी श्रीमान मध्वचार्य यांच्या ग्रंथावर फार मोठ्या टिका लिहिल्या आहेत म्हणून त्यांचे नाव टिकाचार्य असे पड्ले आहे. ते शके १२८७ मध्ये मलखेड येथे समाधिस्थ झाले.