श्री संत गोपाबाई

            मंगळवेढ्यास गोपाबाईची विहीर म्हणून अति प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. मंगळवेढ्याच्या पुर्वेस १ कि. मी. अंतरावर काळ्या रानात आहे. तिचे बांधकाम चागल्या परिस्थितीत आहे. मंगळवेढे हा परगाणा नेहमी दुष्काळी परिस्थितीने ग्रासलेला असायचा. पाऊस वेळेवर पडायचा नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. सर्व सामान्य जनता दुष्काळाच्या खाईत अतिशय त्रासून जायची. त्यावेळी मंगळवेढ्यास कासार कुटूंब धनीक होते. त्यांना लोकांचे हाल पाहावत नव्हते. त्यांनी मनात दृढ निश्चय करून काळ्या रानात विहिर काढण्याचे ठरविले. परंतु विहिरीस पाणी लागेल का? या भावनेने ते उद्दिग्र व्हायचे व त्यामुळे मनात इच्छा असून सुध्दा मार्ग सुचत नव्हता. ते नेहमी चिंताग्रस्त असायचे. अशा प्रसंगी मंगळवेढ्यास एक अतिशय तेजस्वी तपस्वी आले. साधू महाराजांची तप सामर्थ्याची प्रसन्न मुद्रा पाहुन लोक त्यांना साष्टांग दंडवत घालत. साधू महाराज आपल्या मधुर वाणीने लोकांना दिलासा देत व लोकांच्या अडीअडिचणी दूर करुन त्यांना सन्मार्ग दाखवत. अशा वेळेस हे धनिक कुटूंब सुद्धा त्यांच्या कडे गेले.
            मंगळवेढ्यातील जनतेचे पाण्यावाचून होणारे हाल, त्रास त्यांनी साधू महाराजांना कथन केला. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांनी त्या शेतक-यास विहीर काढण्याची जागा दाखविली. अशी पण एक दंतकथा आहे की या महाराजाने त्या शेतक-याला विहीरत पाणी लागण्यासाठी त्या शेतक-याच्या बाळांतीण सूनेस विहिरीत जिवदान द्यावे लागेल असे सांगितले. परंतू त्या कुटुंबाला चिंता वाटू लागली की काय करावे? त्यांनी आपली सून गोपाबाईला हा सारा वृतांत कथन केला. तेव्हा गोपाबाईने त्यांना "तुम्ही चिंता करु नका मी जनतेच्या कल्याणासाठी जीवदान देण्यास तयार आहे. तुम्ही विहिर काढून माझी (विहिरीत) राहण्याची व्यवस्था करा" असे सांगितले.
            थोड्याच दिवसात विहीर खोदली गेली. त्या विहीरीत  गोपाबाईला राहण्यासाठी स्वतंत्र खोली पण बांधली गेली, त्यात संसाराचे सर्व साहित्य पण ठेवले गेले. आणि अशा या खोलीत गोपाबाई जाऊन राहीली व नंतर त्या विहीरीला खूप पाणी लागले, पण त्यासाठी गोपाबाईला आपले जीवदान द्यावे लागले.
            अलीकडच्या काळात जेव्हा या गोपाबाईच्या विहीरीचे पाणी, दुष्काळामुळे पूर्ण आटले, तेव्हा मंगळवेढ्यातील लोकांनी गोपाबाईची ती खोली पाहण्यासाठी गर्दी केली. ती खोली जशीच्या तशी आढळून आली.
            ही दंतकथा पिड्या न पिड्या चालत आली आहे, त्या मध्ये किती सत्य आहे, हे कोणास ठाऊक नाही, परंतु गोपाबाई ही संतरुपी सर्वांच्या लक्षात सदैव आहे.