श्री बाबा महाराज आर्विकर

        मंगळवेढा तालूक्यातील १३ किमी अंतरावर, सोलापूर रस्त्यावर, श्री क्षेत्र माचणूर आहे. माचणूर हे चंद्र्भागेच्या तीरावर वसलेले आहे, व एक पुरातन सिध्दस्थान आहे. स्कंधपुराणात वर्णन केलेले दत्तपद क्षेत्रातील, साक्षात शिवशंकराचे हे ह्रदयस्थान आहे. आजही या ठिकाणी श्री सिध्देश्वराचे पुरातन देवालय असून, राणी अहिल्यादेवीने बांधलेला प्रचंड घाट आहे. चंद्रभागेच्या पात्रातच श्री जटाशंकराचे मंदीर आहे. या घाटाच्या वरच्या बाजूला मोक्षधाम आश्रम आहे.
        श्री बाबामहाराज आर्वीकर हे अलिकडचे (१९२५-१९७१) होऊन गेलेले थोर संत, योगी, कवी आणि तत्त्वज्ञ. ’दिव्यामृतधारा’ आणि ’माचणूरचे ह्रदगत’ ही त्यांची दोन पुस्तके त्यांच्या इश्वरनिष्ठेविषयी आणि विश्वप्रेमाविषयी सर्व काही सांगून जातात. धर्मपुरुष या एकाच शब्दात त्यांचे दर्शन घडते.
 
 
 
 
 
 
        
 वृंदावन, हरिद्वार, ह्रषिकेश अशी यात्रा करीत करीत श्री कानीफनाथांच्या आदेशाने फिरत फिरत अक्कलकोट येथे आले आणि श्री स्वामी समर्थांचा शुभाशिर्वाद मिळवून त्यांच्याच आज्ञेने पुरातन सिध्दक्षेत्र माचणूर येथे येऊन विसावले. तो साधारण १९५४-५५ चा सुमार होता.
        माचणूर त्या वेळी उपेक्षित स्थान होते. पण बाबांच्या आगमनानंतर तेथे एक ऋषी आश्रम उभा राहिला. साधक जमू लागले. साधना सप्ताह होऊ लागले. ’साधन-संहिता’ तयार झाली. धर्मकिर्तने होऊ लागली. कालोचित धर्मचक्रप्रवर्तन सुरु झाले. धर्म आणि त्यांच्या व्यवस्थापनेचे सुसूत्र विचार आकार घेऊ लागले. समाजमनातील पारमार्थिक उदासीनता दूर करण्याच्या माचणूरप्रणित धर्मानुशासनाचे एक नवे पर्व सुरु झाले. धर्मानुशासनाने मनुष्य घडविला जातो. त्याचे मन, बुध्दी, चित्त शुध्द होते
श्री बाबा हे मुळातच कविमनाचे तत्त्वज्ञ संत होते. मानवजातीबद्दल त्यांना नितांत कळवळा होता आणि ज्ञानेश्वर माऊलीने आखून दिलेला विश्वप्रेमाचा आणि मानवसेवेचा राजमार्ग सकळ जनांसाठी त्यांना उजळायचा होता. त्यांना मुमुक्षूंना या राजमार्गावरून प्रत्यक्ष  न्यावयाचे होते. मोठा आखिव-रेखिव कार्यक्रम, त्यामागे उदात्त विचारांचा आशय आणि अविरत कष्ट करण्याचा सेवाभाव यामुळे या धर्मपुरुषाने थोडया अवधीतच दिव्यामृतधारेचा अक्षरश: वर्षाव केला.
 
सदरचा मजकूर हा श्री बाबा महाराज यांच्या शिष्या, तपस्वी श्रीमती जिजाताई हाटे यांच्या ’संत चरित्रमाला’  या पुस्तकातून घेण्यात आला आहे.


विदर्भातील आर्वी या संतभूमीत जोशी (दुचक्के) या पवित्र कुळात, ३ ऑगस्ट १९२५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा योगीराज श्री काशिनाथपंत जोशी हे एक तपस्वी पुरुष होते. त्यांचाच थोर आध्यात्मिक वारसा मोरेश्वरास (श्री बाबा महाराज यांचे नाव) लाभला. श्री बाबा लहानपणापासून एकांतप्रिय आणि चिंतनशील होते. त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचे वडील वारले. आणि त्यानंतर एक दोन वर्षातच श्री बाबानी एका मध्यरात्री नेसत्या वस्त्रानिशी घर सोडले आणि बरे वाईट प्रसंग सहन करत अयाचित वृत्तीने ते पंढरपूरी आले. तेथून ते पंढरीरायाच्या आज्ञेने नाशिक क्षेत्रास गेले. नाशिक क्षेत्रात त्यांना महान योग्यांचे दर्शन झाले, मार्गदर्शन मिळाले. त्याप्रमाणे ते तेथून नर्मदातीरावरील ओंकारेश्वर येथे गेले. त्या तपोभूमीत त्यांना यति महेश्वरनंदांचे दर्शन लाभले. बोध मिळाला व जिवनाचे सार्थक झाले. मग त्यांची तिर्थयात्रा सुरु झाली.