जोहार माय बाप जोहार

.     दि.१६ जून २००९ रोजी  maharashtratimes.com वरील श्री सचिन परब यांचा लेख
    
        समाजव्यवस्थेने केलेल्या अन्यायाविरुद्ध विठूपाटलाच्या महाद्वारी उभा राहून चोखा महाराने केलेला जोहार हा विद्रोहाचा पहिला मराठी हुंकार होता. पण त्यातली काळजाला घरं पाडणारी वेदना आजही तितकीच अस्वस्थ करणारी आहे. साक्षात पांडुरंग ज्याच्यासोबत मेलेली ढोरं ओढायला यायचा तो महान संत वारकरी क्रांतीचा एक महत्त्वाचा सेनानी होता. संतश्रेष्ठ चोखामेळांचं जीवन आणि तत्त्वज्ञान समजून घेण्याचा हा प्रयत्न. वारीचे अठरा दिवस अठरा लेखांतून चोखोबा मांडत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे मेट्रो एडिटर सचिन परब.
पालखी निघालीय. देशभरातले लाखो वारकरी निघालेत. त्यांच्या झपझप पावलांतून सख्या पांडुरंगाला भेटायची आस ऐकू येतेय. गेली शेकडो वर्ष हाच नाद न थांबता , न अडखळता , सतत ऐकता येतोय. प्रत्येक पावलाचा हा नाद सारखाच आहे. श्रीमंताचा आणि गरिबाचा , अडाण्याचा आणि डबल ग्रॅज्युएटचा. मराठ्याचा आणि मुसलमानाचा. सगळ्यांचा एकच नाद. समतेचा पाया मजबूत असल्याचा हा खणखणीत आवाज. 

        या पायरवाचा नादब्रह्म शोधत कमीत कमी सात-आठशे वर्ष तरी मागे जावं लागतं. एका तरुणाने बंडखोरी केली. संस्कृतच्या कडीकोयंड्यात डांबून ठेवलेलं समतेचं तत्त्वज्ञान उघडं केलं. भगवंताने गीतेत सांगितलेला लोकसंग्रहाचा मार्ग सगळ्यांना खुला केला. ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिकेनं सगळं उलटंपालटं केलं. तो सतरा वर्षांचा तरुण पुढच्या अनेक पिढ्यांची ज्ञानेश्वर माऊली बनला. त्याने इतिहास निर्माण केला. अनेक क्रांत्या घडवणारी क्रांती उभी केली. 

        त्यांच्यापूर्वीच्या अनेक पिढ्यांची सद्विचारांची बैठक पक्की होती. म्हणून एकाच वेळी या क्रांतीचे पाईक उभे राहिले. ज्ञानेश्वर नामदेवांच्या करंगळीने हा पर्वताला आधार दिला होता. पण तेवढ्याच तोलामोलाच्या संतमेळ्याच्या काठ्या सोबतीला नसत्या तर शेकडो वर्ष हा गोवर्धन पर्वत तरला नसता. समाजाच्या सर्व स्तरातले संत या मांदियाळीत ओळीने उभे होते. एक अधिष्ठान , एक मार्ग आणि एक दिशा असणारी ही पक्की टीम होती. 

        त्यात गोरा कुंभार होते आणि विसोबा खेचरही होते. योगी चांगदेव होते तर दासी जनी होती. सेना न्हावी आणि सावता माळी होते. वेश्या कान्होपात्राही होती. एवढंच नाही त्यात तर परंपरेने अस्पृश्य ठरवलेल्या समाजातून चोखामेळांसारखा दिग्गज संतही उभा राहिला. या संतमेळ्यात या प्रत्येकाचा अधिकार तेवढाच मोठा होता. तेव्हाच्या समाजव्यवस्थेने केलेले अन्याय आणि त्या विरोधात विठूपाटलाच्या महाद्वारी उभा राहून चोखा महाराने केलेला जोहार हा विद्रोहाचा पहिला मराठी हुंकार तर होताच , पण त्यातली काळजाला घरं पाडणारी वेदना आजही तितकीच अस्वस्थ करणारी आहे. 

        म्हणून ही क्रांती आजही तेवढीच महत्त्वाची आहे. आज सोशल इंजीनिअरिंगचे नवनवे फॉर्म्युले रोज निघत आहेत. पण त्यातून समाजातल्या द-या कमी न होत्या खोलच होत चालल्या आहेत. भेदाभेदाच्या भिंती उंच होत चालल्या आहेत. अशावेळेस समाजातील प्रत्येकाला स्वतःची अस्मिता मिळवून देणारं वारकरी तत्त्वज्ञान मोलाचं ठरतं. 

        स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणा-या इतिहासकारांनी आणि जहालांनी वारक-यांची कणाहीन टाळकुटे म्हणून हेटाळणी केली. त्याचवेळेस पुरोगामी म्हणवणा-या चळवळीवाल्यांनी या परंपरेला प्रतिगामी आणि अफूच्या गोळीचा तुकडा ठरवलं. म्हणूनच कोणतेही पूर्वग्रह न ठेवता , नव्या पिढीच्या नजरेतून आज या सगळ्याकडे बघायला हवं. अशावेळेस चोखामेळा महत्त्वाचा ठरतो. समाजातील शेवटच्या टोकाचा प्रतिनिधी. तरीही ज्ञानेश्वर नामदेवांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो. काय भुललासि वरलिया ढोंगा सारखं महान तत्त्वज्ञान अगदी सहज आपल्या अभंगांतून मांडतो. शूद्रांना ज्ञानाचा अधिकार नाही , मुक्तीचा अधिकार नाही , हे दावे त्यांनी आपल्या जीवनात धुळीला मिळवले आहेत. वेदांनाही नाही कळणारं परब्रह्म त्यांच्यासोबत मेलेलं ढोर ओढायला येत होतं. हे सगळंच अमेझिंग आहे. 

        चोखोबांचं महत्त्व यासाठीही आहे ,. की त्यांनी हे तत्त्वज्ञान स्वतःपुरतं किंवा मंगळवेढ्याच्या महारवाड्यापुरतं न ठेवता संपूर्ण वंचित समाजात चेतना उभा केली असावी , असं दिसतं. स्वतःच्या हृदयात जागा झालेला हरी प्रत्येक पददलितापर्यंत पोहोचावा , अशी त्यांची इच्छा दिसते. म्हणून तर गेली साडेसातशे वर्ष अनेक धक्के पचवत चोखोबांची दिंडी आजही माऊलीच्या पालखीसोहळ्यात मानाचं स्थान मिळवून आहे. चोखोबांची पत्नी सोयराबाई , बहिण निर्मळाबाई , मेहुणा आणि बहिणीचा नवरा असणारे बंका आणि मुलगा कर्ममेळा असं हे अख्ख कुटुंबच या क्रांतीचा वाहक बनलं होतं. या प्रत्येकाचे कमीअधिक अभंग आज उपलब्ध आहेत. अवघा रंग एक झाला हा प्रसिद्ध अभंग सोयराबाईंचा आहे , हे फार कमी जणांना माहित असेल. कर्ममेळ्याला तर पहिला विद्रोही कवी म्हणायला हवी , इतकी त्याची मोठी योग्यता आहे. 

        क्रांती ही फक्त क्रीमपुरती नसते. युनिवर्सिट्या आणि आरामखुर्च्यांवर टेकलेली नसते. ती मातीच्या शेवटच्या थरापर्यंत पोचायला हवी. तर तिला काही अर्थ आहे. गांधीजी आणि टॉलस्टॉयच्या भाषेत सांगायचं तर अन टू द लास्ट पोहोचणारी तीच खरी क्रांती. ही क्रांतीचं यश मोजणारी लिटमस टेस्ट आहे. चोखोबांमुळे वारकरी क्रांती या चाचणीत पास होते. चोखोबांसारखा संताला येथे मानाचं पहिल्या रांगेचं स्थान आहे. अनेक वर्ष ते पददलितांना आदर्श जीवनासाठी माइलस्टोन बनून राहिले. त्यांची दिंडी आजही माऊलीच्या पालखीत मानाचं स्थान मिळवून चालते. म्हणून चोखोबांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. 

        तरीही चोखोबांचा म्हणावा तितका झालेला नाही. आज त्यांची गाथाही बाजारात उपलब्ध नाही. किंवा एखादं चांगलं अस्सल चरित्रही नाही. अभ्यासकांनी संशोधकांच्या दृष्टीने ते अस्पृश्यच आहेत. नव्या संदर्भात चोखोबांचं जीवन आणि तत्त्वज्ञान तपासण्याचं एखाद दुसरा अपवाद सन्माननीय अपवाद वगळता फारसं दिसत नाही. स. भा. कदम या मुंबईच्या गिरणगावातील एका साध्या नोकरदाराने पन्नास वर्षांपूर्वी चोखोबांची गाथा संपन्न केली तेवढीच. कुठेतरी एलिनार झेलियटसारखी अमेरिकन विदुषीने आपलं योगदान दिलं आहे. अरुण कोलटकरांच्या दोन कवितांमधे चोखा डोकावतो. तर रंगनाथ पाठारेंच्या एका कथेतही तो दिसतो. पु. ल. देशपांडेंचा लीड रोल असलेल्या हीच पंढरीची वाट हा चोखोबांच्या जीवनावरचा सिनेमा. लीला गोळेंची एक नवी कादंबरी. यापेक्षा चोखोबाचं अद्भूततेहून अद्भूत असलेलं आयुष्य आपल्या सारस्वतांना फारसं अप्रूप वाटलं नाही. हे महाराष्ट्राचं दुर्देवच. 

        दुसरीकडे चोखोबा ज्या दलित समाजातून आले , त्याच्या गेल्या काही पिढ्यांनी त्यांना आपलं मानलेलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धधर्म स्वीकारला. नवी अस्मिता मिळवून देणारं तत्त्वज्ञान दिलं. या विद्रोही वणव्यात चोखोबांसारखे दलित समाजाचे जुने अभिमानबिंदू बाजुला फेकले गेले. त्यांनी कुठकुठे इतिहासात नागवंश वगैरे नवी प्रतीकं शोधली. ते एका दृष्टीने योग्य असेलही , पण चोखोबांसारखा तुलनेने जवळच्या इतिहासातला आणि आपल्याच मातीतला खरा वारसा विद्रोही दलित नेत्यांनी थेट नाकारलाच. क्वचित कुठेतरी शंकरराव खरात , नामदेव ढसाळ , पुण्याचे बी. सी. शिंदे यांनी चोखोबांवर अभ्यास केलेला आढळतो. पण आता नव्या समन्वयी बहुजनवादी मांडणीत वारकरी संप्रदायाचं मोल नव्या अभ्यासकांच्या मांडणीतून दिसून येतंय. त्यातून कालपर्यंत अगदीच नाकारलेला चोखोबांचा वारसा नव्या दृष्टीने पुन्हा स्वीकारला जाईलही. 

        पण तोपर्यंत त्याची जमीन तयार करायला हवी.

सचिन परब
sachin.parab@timesgroup.com

 


Comments