मंगळवेढा लयास जाणारे वैभव

६ जून २००८ रोजी maharashtratimes.com वर मंजिरी जमदग्नी यांनी लिहिलेला लेख.
पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, ही मराठी मनाची भावभोळ्या भक्तिची ठिकाणं. इरावती बाईंचा बॉयफ्रेण्ड तर जर्मनीच्या डॉ. गुंथर सोन्यायमर यांची श्रद्धा जिंकणारा कानडा विठ्ठलू पाहाण्याची तीव्र उर्मी मनात होती. पंढरपूर बरोबरच तुळजापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा या जळच्या ठिकाणांनाही धावती भेट देण्याचा बेत होता. तुळजापूरची काळवृत्ती दगडांतील देवी, भव्य मंदिर पाहून मन साडेतीनशे वर्ष मागे जातं.
 
मंगळवेढा हे पर्यटनाच्या दृष्टीने काहीसं अप्रचलित ठिकाण

कवि राजा मंगळवेढेकर इथलेच.

असे कसे असे कसे - रात्रीचेच चांदणे दिसे।।

असे कसे असे कसे - मोरालाच संुदर पिसे।।

असे कसे, असे कसे - पाण्यातच झोपती मासे।।

असे कसे, असे कसे - आईसारखे कुणी नसे।।
त्यांची ही नादमय आणि नाट्यमय कविता गुणगुणतच आम्ही मंगळवेढ्यात प्रवेश केला. तिथल्या दामाजीपंतांचं मंदिर आवर्जुन पाहायचं होतं. सन १४५८ मधील गोष्ट. दामाजी पंत मंगळवेढ्यात महसूल अधिकारी म्हणून नियुक्त होते. पण त्या वषीर् प्रचंड दुष्काळ पडला. अन्न तुटवड्यामुळे भुकबळी जाऊन आतोनात मनुष्यहानी होत होती. अशा वेळी दामाजीपंतांनी सद्विवेकाला स्मरून सरकारी धान्य कोठारं जनतेसाठी खुली केली. लोक भरभरून धान्य घेऊन जात होते. दामाजीपंतांना दुवा देत होते. तेव्हाचा राज्यकर्ता, बहमनी सुलतान हुमायुन याला ही वार्ता समजताच त्याने पंतांना अटक करून दरबारात पेश करण्याचे आदेश दिले. बिदरच्या दरबारात जात असताना दामाजीपंतांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले अन् ठाम पण शांत चित्तवृत्तीने ते सुलतानाला सामोरे गेले. दुसऱ्या दिवशी साक्षात पांडुरंग एका साध्या गावकऱ्याच्या वेशात दरबारी गेले आणि दान दिलेल्या धान्याइतकी रक्कम अदा करून दामाजीपंतांची सुटका केली. ही सारी कथा लहानपणापासून ऐकलेली. त्याच दामाजीपंतांचं मूळ मंदिर आणि नवीन मंदिर, दोन्ही, आजूबाजूला आहेत. मंदिरात पादुका आहेत. विशेष म्हणजे आजही तिथे अन्नकूट चालवलं जातं. सकाळच्या वेळी येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाला तिथे भात-भाज-भाकरी असा साधा पण पौष्टिक प्रसाद दिला जातो.

या मंदिराच्या बाहेरच एक भारदस्त दगडी शिवलिंग उघड्यावर ठेवलेलं आहे. तिथे एक गर्दुल्ला आपली भावसमाधी लावून बसला होता. आजूबाजूला विचारणा केली तर असं कळलं की ते शिवलिंग पहिल्यापासून उघड्यावर पडलेलं आहे. त्याबद्दल फारसं गैर कोणाला वाटलं नाही.

ही सारी भटकंती सुरू असताना चष्म्याची काच अवचित निखळली आणि मंगळवेढ्यातील बारिकश्या गल्लीतील चष्म्याच्या दुकानात मी हजर झाले. दुरुस्ती सुरू असतानाच गप्पांची देव-घेव झाली व इथे जवळच एक प्राचीन शिवमंदिर आहे, असा महत्त्वाचा दुवा मिळाला. आणि खरोखरच दहा मिनिटात आम्ही एका तळ्यापाशी आलो. तळ्याला खोदीव पायऱ्या होत्या, पाणी हिरवकंच! बाजूच्या भिंतींवर झाडांनी जोरदार मुक्काम ठोकला होता. काठाच्या बाजूला मूतीर् नसलेली रिकामी घुमटी होती तर बाजूच्या दगडांवर देवीची अधीर्मुधीर् पण रेखीव मूतीर् होती. आम्ही सारेच अस्वस्थ झालो.

बाजूच्या शिवमंदिरात पाय दुमडलेला सालंकृत नंदी होता. देवळाचं बांधकाम हेमाडपंती पद्धतीचं. हे देऊळ तब्बल आठव्या शतकात बांधलं गेलं. तर पंधराव्या शतकात त्याची पुर्नबांधणी केली गेली. तिथे एक शिलालेखही आहे. गणपती आणि शंकराचं दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणेच्या मार्गाला लागलो. तर प्रदक्षिणेच्या वाटेवर मानवी विष्ठा, आजूबाजूला उमसलेले वास! देवळाच्या आवारात मोठी-मोठी भांडी ठेवली होती. खव्यासाठी मोठ्या घमेल्यात घाणा लावला होता. देवळाच्या नक्षीवर बिनदिक्कत कपडे वाळत घातले होते. कोण्या एका अमराठी हलवायाने या पवित्र शिवालयाचा दुग्धालय ते शौचालय असा सुलभ वापर करून साक्षात सर्वात्मकालाच वेठीला धरलं होतं. आमची मती कुंठीत झाली.

तीच गोष्ट भुईकोट किल्ला व सरदार बापू गोखले यांच्या घराबद्दल म्हणता येईल. सन १५७२ साली हा १२४५ फूट लांबीचा भुईकोट किल्ला बांधला गेला. त्याची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. बिदरमध्ये १५ व्या शतकात अनेत जैन मंदिर होती. ती मंदिरं क्रूरपणे उद्धस्त करून त्याच भगन् अवशेषांचा वापर करून हा सात बुरुजांचा भुईकोट किल्ला बिदरच्या मुसलमानी राज्यर्कत्यांनी बांधला. या किल्ल्याच्या आत अजून एक छोटा किल्ला बांधला त्याचं नाव चौबुजीर्. नावाप्रमाणेच त्याला चार बुरूज आहेत. आकार चौरस असून २३० फूट लांबी आहे. आष्टी इथल्या इंग्रजांबरोबरच्या लढाईत कामी आलेले पेशव्याचे शेवटचे सरदार बापू गोखले यांचं घरही मंगळवेढा इथे भंगलेल्या स्थितीत आहे.

संत चोखोबा आणि कान्हापोत्रा यांचं मंदिर केवळ मंगळवेढा इथेच आढळतं. मंगळवेढा ही संतांची भूमी. दामाजीपंत, चोखोबा, कान्होपात्रा इथलेच. श्री अक्कलकोट स्वामींचं बारा वर्ष इथे वास्तव्य होतं. अशा धामिर्क अधिष्ठानाच्या भूमीत ऐतिहासिक मानचिन्हांची अशी हेळसांड पाहून मन खिन्न झालं. आज पर्यटनाची चांगली मागणी आहे. राज्यकतेर्, रहिवासी, स्थानिक संस्था यांनी पुढाकार घेऊन इथे स्वच्छता केली, घुसखोरीला आळा घातला. पुरातत्व खात्याच्या मदतीने डागडुजी केली तर मंगळवेढा हे पर्यटनाच्या नकाशावर आपला ठसा उमटवलेला हे नक्कीच. त्यातील काही ठिकाणांना र्वल्ड हेटिरेज फाउण्डेशनच्या मदतीने सुरक्षा व निधीची तजवीजदेखील करता येईल. गरज आहे ती कृतीशील व कळकळीच्या कार्यर्कत्यांची अन् इतिहासप्रेमी हृदयाची!

मुळ लेख इथे वाचा.