बहामनी राज्य

                     हसन गंगूने इ.स. १३४७ मध्ये बहामनी राज्य गुलबर्गा येथे स्थापले. इ.सन. १४२९ मध्ये बिदरला अहमदशहा याने राजधानी आणली. अहमदशहावल्ली या नावाच्या बादशहाने इ.सन. १४२२ ते १४३५ पर्यंत राज्य केले. सर्व बहामनी बादशहामध्ये हा चांगला बादशहा होऊन गेला. त्यावेळी बिदर येथे दामाजी म्हणून एक कारकून दरबारात चमकला. मुसलमानी राज्य बिदरला असल्यामुळे हिंदू लोकांना धर्म पाळण्यास फार अडचण पडत होती. दरबारामध्ये मुसलमान नोकरांबरोबरच हिंदू लोकांचाही भरणा होता. त्यातच दामाजीचीही नेमणूक बहामनी दरबारात झाली. त्यावेळी बिदरचा किल्ला संपूर्ण बांधून तयार झाला होता.
            दामाजीपंतास रोज तख्त महालात बसून दफ्तर संभाळावे लागे व काम करावे लागे. पंचवीस वर्षे वय असले तरीही दामाजीपंतांचा चेहरा श्रध्दाळू व भाविक दिसत असे. रोज स्नान करून कपाळावर मोठा गंध लावण्याची त्यांची प्रथा होती. दरबारात येतानाही ते टिळा लावून येत असे. त्यामूळे चटकन ते लोकांच्या डोळ्यात ते भरत असत. त्यांची अंगकाठी व शरीरयष्टी कमवलेली होती. ते घोड्यावर बसण्यात पटाईत होते व दांडपट्टा चांगला खेळत असत. त्यांचे मोडी अक्षर मोत्यासारखे वळणदार होते. त्यामूळे त्यांच्या कामावर त्यांचे वरिष्ठ खूष असायचे. दामाजीपंतही प्रामाणिकपणे काम करायचे, त्यामूळे वरिष्ठांची त्यांच्यावर मर्जी बसली. अहमदशहावल्ली हे बादशहा चांगले असल्याने हिंदूच्या अंगचे गुणांचे सुध्दा ते कौतुक करायचे.
एकदा दफ्तरखान्यातील सर्व कारकून काम संपवून गेले तरी सायंकाळी दामाजीपंत काम करीत बसलेले आढळले.
 
            बादशहा दामाजीपंतास म्हणाले..."अभी तक काम कर रहे हो?"
 
            त्यावर दामाजी पंतानी उत्तर दिले..."  आज का काम अबतक पुरा नहीं हुआ, वह पुरा कर रहां हूं। हर रोज काम पुरा करके ही घर
                                                    जाने की मुझे आदत है ।"
 
            हे ऎकून बादशहास फार आश्चर्य व आनंद ही झाला.
 
            बादशहा म्हणाले.." इस तरह काम करके तुझे क्या मिलेगा? तुम्हारे साथ काम करने वाले सब चले गए।"
 
            त्यावर दामाजीपंत म्हणाले... "काम का बदला देना ईश्वर के हाथ में हैं, मैं अगर मेरा फर्ज पुरा करूं तो उससे मुझे दिल की
                                            तसल्ली मिलती है।"
 
            बादशहा म्हणाले..." तेरा ईश्वर कहॉं हैं?"
 
            दामाजीपंत ..."मेरा ईश्वर हर जगह मौजुद है।"
 
            या संभाषणाने बादशहा खूष झाला आणि त्यांनी दामाजीपंतांची बढती नायब तहसिलदार म्हणून केली.
 
            अहमदशहावल्ली नंतर त्यांचा मुलगा अल्लाउद्दीन दुसरा बादशहा झाला. तो पराक्रमी होता. त्यांने बिदरचे साम्राज्य वाढवले. त्यावेळी दामाजीपंतास नायब तहसिलदार म्हणून सैन्यांबरोबर जावावे लागायचे.
            वयाच्या ४० व्या वर्षी पंढरपूरच्या पाडूरंगाचे दर्शन घेण्याचा योग त्यांना प्रथम आला व पंढरपूरचा दिव्य सोहळा पाहून ते वारकरी पंथाचे अनुयायी झाले. पांडूरंगाचे निस्सीम भक्त म्हणून धार्मिक गोष्टीकडे विशॆष लक्ष देऊ लागले. गीतेच्या पठनाबरोबर ज्ञानेश्वरीचे वाचनही ते आवडीने करू लागले. त्यावेळी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व ठिकाणी उपलब्ध नव्हता, तरीही दामाजीपंतानी ती प्रत मिळवून त्याचे अध्ययन सुरु केले.  दरबारातही  हुशार, संत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून दामाजीपंतांची ख्याती झाली.