मंगळवेढ्यात आगमन

             दामाजीपंतांची भार्या (पत्नी), सावित्रीबाई  ही सुध्दा एक अनुरुप अशी साध्वी, सुशील, पतिव्रत्ता होती. सावित्रीबाईंनां लिहीणे वाचणे येत असे. लहानपणी ती आई-वडिलांना पोथ्या-पुराणे वाचून दाखवयाची. त्यामुळे तिला रामायण, महाभारत यामधील गोष्टी चांगल्या माहिती होत्या. तीसुध्दा श्रध्दाळू असल्याने, आलेल्या पाहूण्यांचा अतिथी सत्कार करणे, सुगृहिणी म्हणून चांगला प्रपंच करणे, दानधर्म करणे वगैरे गोष्टी ती व्यवस्थितपणे पार पाडायची. कोणीही व्यक्ती दामाजीपंतांच्या घरातून विन्मुख जात नसे. दामाजीपंत नौकरीनिमित्त परगावी गेल्यास सावित्रीबाई घरचा कारभार चांगल्या पध्द्तीने सांभाळीत असत.
            इ.सन. १४५० मध्ये दुसरा अल्लाउद्दीन बादशहा राज्य करीत असता, त्याचा भाऊ, राजपुत्र, अहमदशा याने स्वतंत्र होण्याच्या इच्छेने सैन्य जमवून सोलापूर व त्याच्या आसपासचे किल्ले घेतले. तेंव्हा त्याचे परिपत्य करण्याकरिता बादशहा अल्लाउद्दिनने सैन्य पाठविले. त्यामध्ये दामाजीपंतांना तहसिलदाराचे अधिकार देऊन व सैन्यातही नायबसुभेदाराचे अधिकार देऊन सैन्याबरोबर पाठवले. या सैन्याने अहमदशा याचा पराभव करून त्यास रायचूर कडे पिटाळून लावले, व सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, कासेगांव वगैरे सर्व मुलूख पुन्हा अल्लाउद्दीन बादशहाच्या अधिपत्याखाली आला. व दामाजीपंतांची नेमणूक मंगळवेढे ठाण्यास सुभेदार व तहसिलदार म्हणून झाली. दामाजीपंत सावित्रीबाईसह मंगळवेढ्यास येऊन बहामनी राज्याचा प्रतिनिधी म्हणून काम पाहू लागले.
            पंढरपूर हे त्याकाळी तीर्थक्षेत्र म्हणून फारसे प्रसिध्दीस आलेले नव्हते. दामाजीपंत तहसिलदार म्हणून मंगळ्वेढ्यास आल्यापासून दर एकादशीस सपत्नीक जाऊन, चंद्र्भागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेत असत. एवढेच नव्हे तर विठठलाचे दर्शन घेण्यासाठी ते पंढरपूरला वारंवार जात असत. पंढरपूरास वारीकरिता मंगळवेढ्याहून वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर जाऊ लागली. स्वत: श्री दामाजीपंतानी पांडूरंगाच्या भक्तीकरिता लोकांना प्रोत्साहन दिल्यामुळे, मंगळवेढ्यामध्ये  भजनी मंडळी व वारकरी संप्रदाय यांचा फार मोठा प्रसार झाला. मंगळवेढ्याचा दामाजीपंतांचा वाडा हे वारकरी लोकांचे आश्रयस्थान झाले. व पंढरीस जाणारे दिंड्या, भजनी मंडळी मंगळवेढ्यास राहून दामाजीपंतांचे दर्शन घेऊन पंढरपूरास जाऊ लागले. दामाजीपंताचीही दिवसेंदिवस संत म्हणून ख्याती वाढू लागली.
            दामाजीपंत तहसिलदार झाल्यापासून मंगळवेढ्याचा कारभार सुधारला. लोक सुखी व आनंदी झाले. परचक्राची भीती नाहीशी झाली. बहामनी राज्य जरी असले तरी, बिदरपासून दूर असल्याने मुसलमानांपासून होणारा उपद्र्व कमी झाला व दामाजीपंतांच्या कारभारामुळे प्रजा सुखी व संतुष्ट झाली. तिकडे बिदरला दुसरा अल्लाउद्दिन बादशहा मयत झाला. व जालीम हुमायूनशहा या बादशहाचा जहरी अंमल सुरु झाला.
            बिदरचा बादशहा हुमायूनशहा इ. सन. १४५८ साली गादीवर आला व बिदरला जूलमी राजवट सुरु झाली. हा राजा इतका क्रुर, विषयलंपट व राक्षसी स्वभावाचा होता की फेरिस्तासारख्या इतिहासकारानेही त्याला जालीम ही उपाधी दिली. या बादशहाने आपल्या भावास क्रुर भूकेल्या वाघाच्या तोंडी देऊन मारविले. आपल्याविरुध्द कोणी बोलत असल्याचा  जरी नुसता संशय आला, तरी तो त्याचा शिरच्छेद करण्यास मागेपुढे पाहत नसे. हजारो लोकांनां किल्ल्यात आणून  हालहाल करून मारले जात असे.
 अशा या क्रुर राजेशाहीत बिदरपासून १२० ते १३० मैल लांब असलेल्या मंगळवेढ्याला दामाजीपंत तहसिलदार म्हणून सन १४५८ ते १४६० पर्यंत काम करीत होते आणि याच वेळेस दामाजीचा दुष्काळ म्हणून प्रसिध्द असलेला दोन वर्षाचा दुष्काळ मंगळवेढ्याच्या आसपास पडला होता.