दामाजीपंतांचा दुष्काळ

                 इ.सन १४५८ उजाडले, व पावसाने अशी काय दडी मारली की तब्बल दोन वर्षे पाऊस बिलकुलही पडला नाही.
            मंगळवेढयाच्या  आसपासचा सर्व मुलूख दुष्काळाच्या खाईत लोटला गेला. पंढरपूर, सोलापूर, सांगोला, विजापूर या सर्व भागातील लोक भूकेने मरू लागली. त्यावेळी दळणवळणाची साधने फारशी नव्हती. रस्ते नव्हते. जवळपासच्या कोणत्या मुलखांत सुबत्त आहे याची माहीती जनतेस कळत नव्हती. त्यामुळे स्थलांतर करून अथवा परठिकाणांहून माल आणून दुष्काळग्रस्त लोकांना पुरविण्याची सोय नव्हती. धान्य महाग झाले, तरीपण धान्य मिळेना. लोक पैसा व दागिने घेऊन अन्नासाठी हिंडू लागले. त्यातच गांवातील विहीरी व तळी आटू लागली. गुरांनां पिण्यास पाणी व खाण्यास वैरण मिळेना. लोकांनी प्राणांपेक्षा प्रिय असलेली गुरें मोकळी सोडून दिली. गुरांना बाजारातही कोण विकत घेईना. घरातले धान्य संपले म्हणून लोक भीक मागू लागली. कोणी भिक घालेना, म्हणून लोक रस्त्यावरच उपाशी पोटी पडू लागली. तरूण लोकांपेक्षा, वृध्द व लहान मुलांचे हाल बघवेनासे झाले. पंढरपूरला ही लोकांचे या दुष्काळामुळे हाल झाले. चंद्र्भागा गोठली, तीत लोकानी पाण्यासाठी झरे काढले.
            त्यावर्षी मंगळवेढ्याला मात्र चमत्कारस्वरूप जो काही थोडाफार पाऊस पडला होता, त्यावर या ठिकाणी पिके आली होती. सरकारी वसून धान्यरुपाने झाला होता आणि ६०० खंड्याची गंगा व जमुना ही दोन मोठी कोठारे ज्वारीने भरलेली होती. मंगळवेढ्यातील लोकांच्या घरीही पुरेल एवढे धान्य होते. दामाजीपंताच्या आश्रया खाली लोक सुखी होते.
 
                जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥
 
            ही कृती प्रत्यक्ष दामाजीपंत व मंगळवेढ्याचे लोक आपल्या कार्यातून दाखवत होते. परगावचा कोणीही पांथस्थ गांवी आला की तो उपाशी पोटी परत जात नसे. मंगळवेढे येथे गेल्यास पोटभर खावायास मिळते ही बातमी वणव्यासारखी चोहोकडे पसरली. एक वेळचे जेवण मिळावे म्हणून बारा-बारा मैल चालत लोक मंगळवेढ्याला येऊ लागले. लोक १०० ते २०० च्या जमावाने येऊ लागले. सगळीकडॆ हाहाकार माजला. लोकांना भुकेपोटी अन्न व पाण्याशिवाय दुसरे काहीच प्रिय राहीले नाही. वर्ष संपत आले तरी दुष्काळाच कहर अजून सुरुच होता. मंगळवेढ्यातील लोकांच्या घरातील धान्य कमी होऊ लागली..परिणामस्वरुप मदत म्हणून भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी त्यांचे हात आता आखडू लागले. १४६०चा पावसाळा लागला खरा, पण पाऊस कुठे आहे? हे वर्ष पण गेल्यावर्षासारखे दुष्काळातच जाते की काय याची भीती आता लोकांना वाटू लागली. आणि नेमके तसेच झाले, सर्व नक्षत्रे पावसाशिवाय गेली...पुन्हा एकदा दुष्काळ..
 
            आता मंगळवेढे गावचे लोकांचेपण धान्य संपले. लोक दामाजीपंतांच्या वाड्यासमोर जाऊन धरणे धरुन बसली. दामाजीपंताची पत्नी सावित्रीबाईनी वेळ ओळखून आपल्या वाड्यात धान्य साठवून ठेवले होते. वाड्यावर आलेला, भुकेने व्याकूळ झालेले लोक, पंगतीने जेवण करुन जात असत. पण वाड्यावरचे ते धान्य पण किती वेळ या लोकांची भूक भागवणार. ते ही धान्य संपले. पण दामाजीपंताच्या वाड्यासमोरील भुकेल्या लोकांची गर्दी काही हटेना