कोठारात धान्य आहे पण..?

                    दामाजीपंतांनी बिदरास दुष्काळाची हकीकत कळविली. पण जालीम हुमायूनशहापर्यंत ही हकिकत कोण सांगणार? चैनीत, जनानखान्यातील ऎश आरामात बादशहा दंग होता. महमद गवाण सारखा हुशार दिवाण होता. पण तो या जालीम बादशहापूढे काय करणार? अनियंत्रित राजसत्ता म्हणजे किती कठोर व लहरी! प्रजा  दुष्काळामुळे मरू लागली तरी बादशहास त्याचे काय? त्याची चैन चाललीच होती. दामाजीपंतांनी एक नाही दोन सांडणीस्वार पाठवले. दरबाराकडून मदत मागविली पण उत्तर नाही. शेवटी मंगळवेढ्याच्या कोठारातील धान्य दुष्काळग्रस्तांना विकत देण्याची परवानगी मागितली, पण त्याचेही काहीही उत्तर नाही. त्याकाळी बिदरहून मंगळवेढ्यास पत्र येण्यास आठ ते पंधरा दिवसही लागत. पण गरिबांनां, उपाशी लोकांना हे सर्व काय माहित? ते दामाजीपंतांनाच गरीबांचा वाली, कनवाळू समजायचे, आणि त्यांच्या वाड्यापूढे याचना करत असत. त्यातच इतरच्या परिसरातील, पंढरपूरातील लोकांनी,  दामाजीपंताकडे गेले की जेवण मिळते, धान्य मिळते हे समजल्याने, आसपासचे लोकही मंगळवेढ्याकडॆ धान्यासाठी येऊ लागली. अनेक लोक या भयान दुष्काळाने मृत्युमुखी पडले
            दामाजीपंत व त्यांची पत्नी, सावित्रीबाई, हे दृश्य पाहून भयभीत झाले. घरातील धान्य, पैसा वगैरे सर्व काही संपले होते. या सर्व लोकांना काही नाही म्हणून सांगायचे त्यांच्या जीवावर आले. दामाजीपंतांच्या डोळ्यासमोर धान्याची कोठारे दिसू लागली. दामाजीपंत विठठलाची आळवणी करू लागले. पंढरपूरकडॆ तोंड करून हात जोडून ते बसले व म्हणाले--- "बा..परमेश्वरा, बिदरहून कोठारातील धान्य फुकट देण्याची नाही का होईना, पण विकत देण्याची तरी लवकर परवानगी येऊ दे."  दामाजीपंत  नामस्मरण करत ध्यानस्थ बसले. बराच वेळ गेला. लोकांची आरडाओरड, रडारड अधिकच वाढली. कुठला स्वयंपाक आणि कुठले जेवण? सारे लोक दामाजीपंतापुढे उपाशीपोटी, उदास चेहरा करून बसले होते.
            दामाजीपंतांनीही सकाळपासून तोंडात पाणीही घातले नव्हते. घरातून त्यांची पत्नी सावित्रीबाई बाहेर आली.
 
            सावित्रीबाई -- "(दामाजीपंतांस) आता उठावे घरात तरी चलावे.
 
            दामाजीपंत --" काय करू घरात येऊन? माझा हा जनताजनार्धन परमेश्वर उन्हातान्हात उपाशी बसला आहे."
 
            सावित्रीबाई --- " मग आता या लोकांनां काय द्यावयाचे?"
 
            दामाजीपंत ---    " आता सरकारी धान्य कोठाराशिवाय काही नाही. पण अजून बादशहाकडून हे धान्य विकण्याची परवानगी आली
                                नाही. काय करावे?"
 
            सावित्रीबाई --- " परवानगी मागाहून येईल, तोपर्यंत या लोकांना धान्य दिले तर लोक तरी वाचतील.
 
            दामाजीपंत ---  "परवानगी शिवाय धान्य दिले म्हणून बादशहाला माझा राग येईल. मला शिक्षा म्हणून तोफेच्या तोंडी अथवा
                               फाशी जावे लागेल. तुला बादशहा  किती  क्रुर आहे, माहीत आहे ना? मी फाशी गेलो तर तुला चालेल काय?"
 
            सावित्रीबाई--- "असे अभद्र काय बोलता हो? कुठल्या बायकोस आपला नवरा फाशी जावा असे वाटेल !"
 
            दामाजीपंत --- "हजारो लोकांचे प्राण वाचवण्याकरिता माझा एक जीव जात असेल तर हजारो जीवांकडे पाहायचे की स्वत:च्या
                              प्राणाकडे पाहायचे? तुला नवरा प्रिय आहे हे खरे, पण हा जनताजनार्धन परमेश्वर नव-याहून प्रिय नाही का?"
 
            सावित्रीबाई -- " मला असे पेचात पाडू नका. मला तुम्ही पाहिजे आणि जनताजनार्धन परमेश्वरही पाहिजे. तुम्हीच माझे परमेश्वर
                            आहात, तुम्हास सोडून मी कशी राहीन?"
 
            दामाजीपंत ---" हे बघ वेळ कठिन आहे. मायामोह यावेळी आवरला पाहिजे. जगाच्या कल्याणाकरिता स्वत:च्या घरादारावर निखारा
                            ठेवण्याची पाळी आली तरी माणसाने स्वत:च्या घराचे बलिदान जगाच्या कल्याणाकरिता केले पाहिजे. पहा---पहा....,
                            डोळे मिटून, चिंतन करून, जनताजनार्धनाला. पंढरीच्या विठ्ठलाचे रुप आठव. मला तर यावेळी या पेवातील धान्य
                            गरीब भुकेल्या जनतेला फुकट वाटावे असे वाटते. ते पैसा कुठला देणार? माझा एकट्याचा जीव हजारो जीवांपेक्षा
                            मोठा आहे काय?"
 
            सावित्रीबाई --- " नाथ, आपण एकटेच का? मीही तुमच्याबरोबर फाशी अथवा तोफेच्या तोंडी जाण्यास तयार आहे. पण परमेश्वर
                            आपला पाठिराखा आहे. तो भक्तांना अशा संकटातून रक्षितो, असा माझा विश्वास आहे."
 
            या प्रमाणे दामाजीपंतांचे आणि सावित्रीबाईचे बोलणे चालू असता, बाहेर जमलेल्या लोकांमध्ये जास्तच आरडाओरड व गोंधळ माजला. खूप वेळ झाला तरी पंतांच्या वाड्यासमोर बसूनही काही मिळॆना. दामाजीपंतांच्या नावे हाका मारून लोक जास्तच गयावया करु लागले.
            बिदरहून सरकारी पेवातील धान्य देण्याचा हूकूम येईना. तेव्हा दामाजीपंतांनी तहसील कचेरीतील हाताखालच्या सर्व नोकरांना बोलावले व विचारविनिमय केला. पण जालीम हुमायूनशहा बादशहाचे क्रुरपणाचा व जुलमी राजवटीचा वचक सर्वांना असल्यामुळॆ कोणीच दामाजीपंतांना सरकारी कोठारातील धान्य या गरीब जनतेला द्यावे, असा सल्ल देईना. दामाजीपंत पुन्हा अस्वस्थ झाले. काय करावे त्यांना सुचेना. आपल्या वाड्यातील देवघरात जाऊन देवापुढे ध्यान लावून ते बसले. बराच वेळ झाला, दामाजीपंत देवघरातून बाहेर येईनात. वाड्यातील सदरेवार जमलेले लोक दुष्काळ पिडितांचे हाल पाहून अस्वस्थ झाले. इतक्यात  देवघरातून दामाजीपंत गंभीर मुद्रा घेऊन बाहेर आले, आणि अंगरखा आणि पगडी घालून तहसिल कचेरीत निघाले. धान्य कोठाराच्या रक्षकांनां व अधिका-यांना त्यांनी बोलावणे पाठवले. त्यांच्या मागून घरापूढे जमलेले गरीब, भूकेने व्याकूळ झालेले लोक पण निघाले. तहसिल कचेरीत येताच दामाजीपंत सर्वांपूढे हात जोडून उभा राहीले, त्यांच्या मुखावर सात्विक तेज दिसत होते. मनात काहीतरी निश्चय केल्याचे दिसत होते. ते सर्वांना म्हणाले---- " इतका वेळ बादशहाची परवानगी येईल, म्हणून मी वाट पाहिली पण परवानगी आली नाही, व तुमचे हाल ही मला पाहवत नाही. म्हणून तुम्ही या कोठारातील थोडॆ थोडे धान्य घेऊन जावे व आपले जीव जगवावे". एवढे बोलून श्री दामाजीपंतांनी कोठाराची कुलपे काढण्यास रक्षकास सांगितले व पेवातील धान्य जितके पाहिजे तेवढे नेण्यास सांगितले. लोक आनंदून गेले. पेवाच्या दारात लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्या. ते दामाजीपंतांना व सावित्रीबाईंना आशिर्वाद देऊन धन्य धन्य तुझी दामाजीपंता असे म्हणून जात असत. हे कोठार लुटण्याचे काम आठ दिवस चालले होते. दामाजीपंतांच्या या कृत्याची चहूकडे वाहवा झाली. दामाजीपंत व सावित्रीबाई, दोघेही शांत चित्ताने राहीली, बादशहा कुठलीही शिक्षा देऊ, ते सोसण्याची तयारी त्या दोघांनी केली होती.