दामाजीपंतांस अटक

                    या जगामध्ये सज्जन थोडे आणि दुर्जन फार आहेत. चांगल्या कार्याची वाहवा दुर्जनांनां बघवत नाही.  मंगळवेढ्यातही दामाजीपंतांच्या कचेरीत काही दुर्जन होतेच. त्यामध्ये मुजुमदार म्हणून एक प्रसिध्द होते. स्वत:च्या हातून तर एकही चांगले कृत्य कधी व्हायचे नाही, पण दुस-याने चांगले कृत्य केलेले बघवत ही नाही. मुजुमदारांना तहसिलदाराची जागा मिळवायची होती. दामाजीपंताबद्दल दरबारात चुगली केली व बादशहाचा दामाजीपंतावर रोष आला म्हणजे आपणास तहसिलदाराची जागा मिळेल, असे त्यास वाटत होते. त्याने बादशहास गुप्तपणॆ पत्र लिहून, ’दामाजीपंतांनी सरकारच्या परवानगीशिवाय सर्व धान्य लोकाना देऊन सरकारची नुकसानी केली आहे’ असे कळविले. आणि दामाजीपंत हे दरबाराविरुध्द वागतात हे ही कळविले.
            बादशहा हुमायूनशहा अगोदरच जालीम म्हणून प्रसिध्द आणि त्यात चुगलीची भर. बादशहा क्रोधित झाला. आणि एकदा बादशहाला राग आला कि त्यापुढे महमद गवान सारखा हुशार असलेला दिवान, जायला धजत नसे. बादशहाने ताबडतोब दामाजीपंतांना पकडून  आणण्याचा आणि कृष्णाजीपंत मुजुमदार यांना तहसिलदार म्हणून नेमण्याचा हुकूम पाठविला. ताबडतोब चार पठाण घोडेस्वार, एक त्यांचा अधिकारी असे मंगळवेढ्यास निघाले व घोडदोड करीत तीन दिवसात मंगळवेढे तहसिल कचेरीत हजर झाले. जालीम हुमायूनशहा यांने कोणास भेटीस बोलावणे पाठवले की म्हणजे तो पुन्हा परत येत नाही, असा त्यावेळी लोकांनां अनूभव होता. म्हणून भेटीस बोलावणे, जाण्यापूर्वी आपल्या बायका मुलांचां निरोप घेऊनच जात असत. आणि येथे तर दामाजीपंतांना पकडून आणण्याचा हूकूम होता. दामाजीपंत कचेरीत काम करीत होते. त्यांनी तो हूकूम पाहून काय समजायचे ते समजले. कचेरीतील सर्वांचा निरोप घेऊन ते घरी सौ. सावित्रीबाई यांचा निरोप घेण्यास निघाले. हा हा म्हणता ही बातमी मंगळवेढे गावात सर्वांना कळाली. सर्व लोक गंभीर चेहरे करून दामाजीपंतांच्या वाड्यासमोर उभी राहीली. ही बातमी ऎकून सावित्रीबाईला रडू कोसळले. आपण ही दामाजीपंताबरोबर बिदरला जावे असे सावित्रीबाईंना वाटले. पण यावर " अगं, आता या वेळेस बिदरला तू कशाला येतेस, मी जाऊन आल्यावर पुन्हा एकद जाऊं." असे दामाजीपंत म्हणाले.
             असे बोलणे चालू असताना, तोच पठाण घोडेस्वार वाड्याबाहेर आले, "अजून तयारी झाली नाही का? लवकर चला. नाहीतर बेड्या ठोकून नेऊ" असे म्हणू लागले. सावित्रीबाई वाड्याबाहेर आल्या व पठाण स्वारांना म्हणाल्या " दामाजीपंत जेवण करीत आहेत. आपणही त्यांचेबरोबर जाणार आहात, तुम्हीही थोडॆ जेवून घ्या."  "नाही...होय" म्हणत पठाण घोडॆस्वारांनीही जेवण केले व सर्वांची निघण्याची सिध्दता झाली. दामाजीपंत तहसिलदारासारख्या नोकरीवरील अधिकारी व लढाईतही वाकबगार. पण वाड्याबाहेर येताच "दामाजीपंतांना बेड्या ठोकून व दंडास मुसक्या बांधून आणण्याचा बादशहाचा हुकूम आहे" असे सांगून पठाण घोडेस्वारांनी दामाजीपंतास मुसक्या बांधून घोड्यावर बसून चालण्यास सांगितले. सावित्रीबाईने हे पाहून हंबरडा फोडला व दामाजीपंत आता परत येत नाहीत हे तिला कळून चुकले. आता पुन्हा दामाजीपंत दिसणार नाहीत असे समजून तिने आकांत करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून सर्व लोक ही हळहळू लागले. कोठारे लुटली म्हणून पंतास धरून घेऊन जात आहेत, ही कल्पना सर्वांना आली. व याची शिक्षा सुध्दा त्यांच्या डोळ्यासमोर आली. सावित्रीबाईनी तरी आता बिदरास बरोबर जाण्याचा हट्टच धरला. दामाजीपंताचे अंत: करण सुध्दा हे दृश्य पाहून हेलावले. सावित्रीबाईची कशी समजूत काढावी, याची पंचाईत त्यांन पडली. संकट काय आहे हे पंतांना कळून चुकले होते, आणि यातच आपण धीर सोडला तर इतरांची काय कथा? म्हणून त्यांनी धीर-गंभीर वृत्ती धारण केली, मनाचा निश्चय केला व ते लोकांना म्हणाले...
            "प्रिय नागरिकहो, असे हताश काय होता. मी काय पाप केले नाही अथवा गुन्हा केला नाही. भुकेलेल्या मंडळीना धान्य वाटले आहे. माझा यात स्वार्थ काय होता? परमेश्वराच्या ठिकाणी हा गुन्हा होणार नाही. बादशहाने जरी मला शासन केले तरी पंढरीचा पांडूरंग जो भक्तांचे रक्षण करण्य़ास सदा सिध्द असतो, तो, माझेही रक्षण करील. तुम्ही स्वस्थ चित्ताने घरी जा आणि परमेश्वरचिंतन करा."
            सावित्रीबाईजवळ जाऊन दामाजीपंत पुन्हा तिचे सांत्वन करु लागले. पंढरीची वारी ते करीत असत ती न चुकता तिला करण्यास सांगून ’आपण निश्चित परत येऊ, काळजी करू नकोस, परमेश्वरावर विश्वास ठेव’ असे तिला पुन्हा पुन्हा सांगितले. इतक्यात पठाणांनी निघण्याचा इशार दिला. दामाजीपंत मुसक्या बांधलेल्या स्थितीत घोड्यावर स्वार झाले, चार घोडेस्वारांच्या मध्ये त्यांचा घोडा चालू लागला. सावित्रीबाई, पंतांच्या सागण्या प्रमाणे वाड्याच्या दारात उभे राहून, दामाजी जात असलेल्या वाटेकडे तोंड करून उभ्या राहिल्या. बाकी जनता दामाजीपंतांच्या मागे धावत रडत माणनदीपर्यंत आली. दामाजीपंताना नेऊ नका असे ते वारंवार घोडेस्वारांना विनवित होते. पण ती आशा ही मावळली. दामाजीपंतांनी पुन्हा एकदा लोकांना विनंती केली आणि घरी परत जाण्यास सांगितले. जनता व्यथित अंतकरणाने मागे फिरली व दामाजीपंताची स्वारी पंढरपूर च्या दिशॆने चालू लागली. मार्ग चालू असताना दामाजीपंत आत्मिक तळमळीने भक्त वत्सल्य पांडूरंगाचे मनोमन चिंतन करीत होते.