दामाजीपंतांना तर आता अटक झाली. पण आपल्या भक्ताला बादशहापासून सोडविण्यासाठी खुद्द पंढरपूरचा पांडूरग गेला. तो ही विठू महाराच्या वेशभूषेत. ती कथा अशी आहे..............
दामाजीपंतांच्या मामलेदार कचेरीत विठू नावांचा एक महार अतिशय प्रामाणिक नोकर होता. त्याकाळी महसूल महाराकरवी राज दरबारी भरण्याची पध्दत होती. आणि हिच युक्ती पंढरीच्या पांडूरंगाने लडविली. डोकीवर फाटकं मुंडास, मलीन फाटके धोतर, खांद्यावर घोंगडी, पायात वहाणा, व हातात घुंगराची काठी आणि कपाळावर गंधाचा टिळा, असे हे पांडूरंगाचे रुप.
बिदरमध्ये पांडूरंग, विठू महाराच्या रुपात गेले असता, असे म्हंटले जाते की, त्यांनी एक पाऊल बिदरच्या वेशीत तर दुसरे पाऊल चक्क बादशहाच्या दरबारात ठेवले. अचानक प्रकट झालेल्या विठूला पाहून बादशहाच्या वजीराने, आपण कोण? कुठून आलात? आत यायला आपणास कोणी अडवले नाही का? असे प्रश्न केले.
त्यावर विठू महार नम्रतेच्या सुरात व धीर गंभीर होऊन म्हणाले, " मी मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांचा प्रामाणिक नोकर आहे. मला विठू महार म्हणतात. माझ्या धन्यास (दामाजीपंत) दुष्काळाने झालेले जनतेचे हाल पाहावेनात, म्हणून हुजूर त्यांनी आपल्या ताब्यातील धान्यांनी भरलेली कोठारातील धान्य विकून, असाहाय्य जनतेचे प्राण वाचविले. त्या मोबदल्यात पैशाचा भरणा करण्यासाठी दामाजीपंतांनी मला पाठवले आहे. असे म्हणून विठू महाराने (पांडूरंगाने) कमरेची थैली काढून बादशहाच्या दरबारात अमीर उमराव यांचे समोर उघडी केली तेंव्हा त्यातून खळखळ असा आवाज होत मोहरांचा प्रचंड ढिग लागला. एवढ्या लहानशा पिशवीतून एवढा मोठा मोहरांचा ढिग पाहून बादशहा आ वासून बघत राहिला. अमीर उमराव व दरबारातील सर्व जनता एकमेकांकडे डोळे वासून आश्चर्याने पाहू लागली. लोकांना कळण्याच्या आत पांडूरंगाने पैशाचा भरणा केल्याची पावती मागितली. आणि पावती मिळताच पांडूरंग दरबारातून अदृश्य झाले, ते थेट दामाजीपंत बिदरच्या वाटेवर ज्या ठिकाणी मुक्कामी होते, आणि तेथेच अदृश्य रुपात ती पावती गीतेच्या ग्रंथात ठेऊन पंढरपूर ला गेले.
|
श्री. संत दामाजीपंत > बहामनी राज्य > मंगळवेढ्यात आगमन > दामाजीपंतांचा दुष्काळ > कोठारात धान्य आहे पण..? > दामाजीपंतांस अटक >